शेती

शेतकऱ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानासह सेंद्रिय शेतीकडे वळावे ; कृषिमंत्री ॲड. माणिकराव कोकाटे

नाशिकदि. ०६ (जिमाका):  रासायनिक खतांच्या वापरातून मानवी आरोग्यावर होणारे दुष्परिणाम टाळण्यासाठी शेतकऱ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानासह सेंद्रिय शेतीकडे वळावे, असे प्रतिपादन राज्याचे कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांनी केले.

युथ फेस्टिवल मैदान येथे आयोजित जागतिक कृषी महोत्सवाच्या उद्घाटनप्रंसगी ते बोलत होते. यावेळी आमदार दिलीप बनकर, अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ गुरुपीठ, त्र्यंबकेश्वर अध्यक्ष गुरूमाऊली अण्णासाहेब मोरे, कृषी सहसंचालक सुभाष काटकर, कृषी उपसंचालक जगदीश पाटील, कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) चे प्रकल्प संचालक अभिमन्यू काशिद, माजी नगरसेवक उद्धव निमसे, वत्सलाताई खैरे यांच्यासह अधिकारी व शेतकरी उपस्थित होते.

कृषी मंत्री ॲड. कोकाटे म्हणाले की, रासायनिक खतांचा शेतीत अतिप्रमाणात वापर केल्यामुळे शेतजमीन नापीक होते. त्यामुळे येणाऱ्या काळात शेतकऱ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाची कास धरून सेंद्रीय शेती केल्यास निश्चितच जमिनीचा कस वाढून शेतजमिनीची उत्पादकता वाढणार आहे. सेंद्रीय शेतीतून पिकवलेले भाजीपाला व फळभाज्या ह्या आरोग्याच्या दृष्टीने सकस व दुष्परिणामरहीत असणार आहेत. शासकीय पातळीवर आयोजित केलेले कृषी महोत्सव व प्रदर्शने शेतकऱ्यांच्या कायम मार्गदर्शक व उद्बोधक ठरले आहेत. या महोत्सवाच्या आयोजित केलेले परिसंवाद व व्याख्याने यांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना शासनाच्या विवधि योजनांची माहिती, शेती व्यवसायातील अनेकविध संधी, आधुनिक शेती तंत्रज्ञान, शेती अवजारे यांची माहिती प्राप्त होणार आहे. प्रदर्शनाच्या ठिकाणी शासकीय, कृषी सलग्न विभाग, खासगी कंपनी, शेती उत्पादिते यांचे स्टॉल्स लावलेले आहेत. यातून शेतकरी ते ग्राहक ही संकल्पना दृढ होवून शेतकऱ्यांना आपल्या मालाला योग्य बाजारपेठ व रास्तभाव मिळणार असल्याचे मंत्री ॲड. कोकाटे यांनी सांगितले.

आज सुरू झालेला जागतिक कृषी महोत्सव हा 10 फेब्रुवारी 2025 पर्यंत सुरू असणार आहे. यात सांस्कृतिक कार्यक्रम, शेतकरी वधु-वर सर्व जाती-धर्मीय परिचय मेळावा, स्वयंरोजगार मेळावा व कृषी क्षेत्रातील रोजगाराच्या संधी, पर्यावरण, दुर्गसंवर्धन, नैसर्गिक शेती, माहिती तंत्रज्ञान जनजागृती, महाडीबीटी योजना या विषयांवर परिसंवाद व मार्गदर्शन तसेच कृषीशास्त्र व पशु गोवंश कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. शेतकरी बांधव व नागरिकांनी या महोत्सवास भेट द्यावी, असे आवाहनही मंत्री ॲड.कोकाटे यांनी केले.

शेअर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नका.