उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांच्या ‘मी विकासयात्री’ पुस्तकाचे प्रकाशन

पुणे, दि. २२: (सौ. महासंवाद) ग्रामीण विकासाच्या क्षेत्रात डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी हे नाव अत्यंत आदराने घेतले जाते. लोकांच्या सहभागातून शासनाच्या योजना कशा यशस्वी होऊ शकतात हे त्यांनी दाखवून दिले. त्यामुळे ते केवळ प्रशासक नव्हते तर एक विकासयात्री होते, अशा शब्दात उपमुख्यमंत्री पवार यांनी डॉ. कलशेट्टी यांचा गौरव केला.
यशदाचे उपमहासंचालक डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी लिखित ‘मी विकासयात्री’ या पुस्तकाच्या बालगंधर्व रंगमंदिर येथे आयोजित प्रकाशनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी राज्य वित्त आयोगाचे अध्यक्ष डॉ. नितीन करीर, यशदाचे अतिरिक्त महासंचालक डॉ. शेखर गायकवाड, महाराष्ट्र राज्याच्या आदर्श गाव योजनेचे कार्याध्यक्ष पद्मश्री डॉ. पोपटराव पवार, अखिल भारतीय मराठी संमेलनाचे माजी अध्यक्ष, ज्येष्ठ साहित्यिक लक्ष्मीकांत देशमुख आदी यावेळी उपस्थित होते.
डॉ. कलशेट्टी हे प्रशासनात मनापासून, जीवन ओतून काम करणारे हळव्या मनाचे व्यक्ती आहेत, असे सांगून उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, डॉ. कलशेट्टी यांनी आपल्या संपूर्ण आयुष्यात ग्रामविकास, ग्रामस्वच्छता यासह लोकाभिमुख अशा योजना चांगल्या प्रकारे राबविण्याचे काम केले आहे. ते गावोगावी फिरले, लोकांच्या समस्या जाणून घेतल्या. लोकाभिमुख काम करत असताना तसेच योजना राबवत असताना प्रशासनात काम करणाऱ्या अधिकाऱ्यांची मोठी गरज असते. डॉ. कलशेट्टी यांनी हे दाखवून दिले असून त्यांनी स्वच्छता मोहिमेत जिल्हा परिषदा, तालुका पंचायती, ग्रामपंचायती, समाजातील प्रत्येक घटकाला स्वच्छतेच्या कामात त्यांनी सहभागी करून घेतले.
यावेळी उपमुख्यमंत्री पवार यांनी डॉ. कलशेट्टी यांनी संत गाडगेबाब ग्रामस्वच्छता अभियान, निर्मल ग्राम अभियान आदी उपक्रमांत केलेल्या कामाच्या आठवणी सांगून चांगल्या कामाच्या आठवणी समाज विसरत नाही, असेही ते म्हणाले. महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील विकासाचे वर्णन ‘मी विकासयात्री’ या पुस्तकात करण्यात आले आहे. डॉ. कलशेट्टी यांनी कोविड परिस्थितीत कोविड जनजागृतीचे कामही चांगल्या प्रकारे केले. त्यांनी भूजल सर्वेक्षण व विकास यंत्रणेच्या प्रमुखपदावर असताना त्यांनी राज्यस्तरीय पाणी गुणवत्ता तपासणी प्रयोगशाळा, राज्य भूजल माहिती केंद्र सुरू करण्याचे काम केले.