महाराष्ट्र आणि झारखंडमध्ये भारतीय निवडणूक आयोगाकडून मोठ्या रकमेचा माल जप्त

नवी दिल्ली : (सौ. पी आई बी) 6 नोव्हेंबर 2024
महाराष्ट्र आणि झारखंडमधील निवडणुका तसेच पोटनिवडणुकांमध्ये मतदारांना प्रलोभन देण्याची प्रकरणे रोखण्याच्या उद्देशाने निवडणूक आयोगाच्या अखत्यारीतील यंत्रणांनी केलेल्या कारवाईत आत्तापर्यंत 558 कोटी रुपये मूल्यांची रोकड, मोफत वाटपासाठी आणलेल्या प्रलोभनपर वस्तू, मद्य, अंमली पदार्थ आणि मौल्यवान धातू जप्त केले आहेत. निवडणुका जाहीर झाल्यापासून केवळ महाराष्ट्र राज्यात केलेल्या कारवाई अंतर्गत सुमारे 280 कोटी रुपये मूल्याचा माल जप्त केला गेला आहे. तर झारखंडमधूनही आतापर्यंत आणखी 158 कोटी रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
दोन्ही राज्यांमध्ये यंदा होत असलेल्या निवडणुकांमध्ये 2019 च्या विधानसभा निवडणुकीच्या तुलनेत एकत्रित जप्तीचे प्रमाण 3.5 पटीने वाढले आहे, 2019 च्या विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्रात 103.61 कोटी रुपये मूल्याचा मुद्देमाल तर झारखंडमध्ये 18.76 कोटी रुपयांचा मुद्देमाल जप्त केला गेला होता.
देशाचे मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी याआधीच सर्व अधिकाऱ्यांना निवडणुकीत कोणत्याही प्रकारच्या प्रलोभनांच्या बाबतीत आयोगाच्या वतीने शून्य सहिष्णूता धोरण अवलंबण्याचे निर्देश दिले होते.