नाशिक महानगरपालिकेच्या आयुक्त तथा प्रशासक मनिषा खत्री यांनी आपल्या पदाची सुत्रे स्वीकारली

नाशिक(प्रतिनिधी) : दि. २८ – नाशिक महानगरपालिकेच्या आयुक्त तथा प्रशासक मनिषा खत्री यांनी पदाची सुत्रे स्वीकारल्यानंतर सर्व खातेप्रमुखांची बैठक घेतली. बैठकीत नाशिक शहराच्या विकासाच्या दृष्टीने सुरु असलेले विविध प्रकल्प सकारात्मक दृष्टया सुरु ठेवणार असल्याचे यावेळी मनिषा खत्री यांनी सांगितले.
त्याचबरोबर सर्व विभागांची प्राथमिक माहिती घेवून त्यांनी सर्व विभागांना त्यांच्या कामकाजाबाबत सादरीकरण करण्याचे आदेश दिले. तसेच केंद्र शासन व राज्य शासनाकडून प्रलंबित असलेल्या विविध प्रश्नांबाबत देखील पाठपुरावा करुन ते प्रश्न मार्गी लावणेकामी सर्वोतपरी प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
खातेप्रमुखांनी सर्व कामकाजात पारदर्शकता ठेवावी व प्रत्यक्ष कामात असलेल्या अडचणींबाबत आपल्याशी थेट संपर्क साधावा असे निर्देश आयुक्त तथा प्रशासक मनिषा खत्री यांनी खातेप्रमुखांना बैठकीत दिले. शहर स्वच्छतेला आपले प्राधान्य रहाणार असल्याचेही त्यांनी याप्रसंगी नमूद केले.
तसेच कामकाजात गतिमानता व सुसूत्रता आणणार असल्याचे याप्रसंगी मनिषा खत्री यांनी सांगितले, नागरिकांना मिळणाऱ्या मूलभूत सुविधा आणि त्यांवर नागरिकांच्या प्रतिक्रिया व अभिप्राय याचा अभ्यास करून त्यानुसार कामकाज करण्यावर अधिकाऱ्यांनी भर द्यावा असेही त्यांनी खातेप्रमुखांच्या बैठकीत नमूद केले.
बैठकी नंतर मनपा आयुक्त तथा प्रशासक मनिषा खत्री यांनी मनपा मुख्यालय,राजीव गांधी भवन येथील विविध विभागांना भेटी देऊन पहाणी केली.