55 व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचा शुभारंभ ऑस्ट्रेलियन चित्रपट “बेटर मॅन” ने

सिनेमामध्ये संगीताप्रमाणेच सीमा ओलांडण्याची आणि भावनांच्या वैश्विक भाषेद्वारे आत्म्यांना जोडण्याची अतुलनीय क्षमता आहे. या परिवर्तनकारी कलाप्रकाराच्या उत्सवात, गोव्याच्या चैतन्यमय संस्कृतीमध्ये आयोजित करण्यात आलेल्या 55व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचा (इफ्फी) प्रारंभ मायकल ग्रेसी दिग्दर्शित ‘बेटर मॅन’ या चित्रपटाने झाला. हा चित्रपट ब्रिटीश पॉप लिजेंड रॉबी विल्यम्स यांची लवचिकता, लोकप्रियता आणि विलक्षण जीवन याला वाहिलेली सिनेमॅटिक श्रद्धांजली आहे. चित्रपटातील कलाकार आणि इतर चमू चित्रपटाच्या प्रदर्शनापूर्वी इफ्फीच्या रेड कार्पेटवर अवतरला.
मायकेल ग्रेसी यांनी दिग्दर्शित केलेला बेटर मॅन हा एक सांगीतिक चरित्रपट आहे. हा चित्रपट वैशिष्ट्यपूर्णरित्या रॉबी विल्यम्सच्या दृष्टिकोनातून सांगितला गेला असून विल्यम्स स्वतः यात संस्मरणीय सादरीकरण करत आहे. त्याचा दमदार आणि मंत्रमुग्ध करणारा स्टेज परफॉर्मन्स यात पाहायला मिळतो.
‘बेटर मॅन’, हा चित्रपट विल्यम्सची सार्वजनिक प्रतिमा आणि व्यक्तिगत जीवनातला संघर्ष यातील द्वैत्वाचा शोध घेत जीवनाचे सार दर्शवतो. कलाकार म्हणून सर्वोच्च स्थानी पोहोचण्याचा त्याचा प्रगतीचा काळ पाहताना त्याचे अंतरंगही प्रेक्षक पाहतात. संगीतामध्ये शांतता गवसण्याचा आणि खरे जीवन म्हणजे काय, याची व्याख्या पुन्हा उलगडण्याचा हा प्रवास आहे.
डोळ्याला सुखावणारी मोहक दृश्यानुभूती आणि रॉबीचे आघाडीचे साउंडट्रॅक यामुळे चित्रपट संस्मरणीय ठरतो. प्रत्येक दृश्य एका विलक्षण जीवनातील अत्युच्च सुखदुःखाच्या क्षणांमध्ये प्रेक्षकांना गुंतवते, ऊर्जेची स्पंदने जागवते.