कार्तिकी एकादशीनिमित्त श्री विठ्ठल रुक्मिणीची शासकीय महापूजा संपन्न

पंढरपूर (दि.12 सौ. महासंवाद) : महाराष्ट्राचे आराध्य दैवत श्री विठ्ठल-रुक्मिणीची कार्तिकी एकादशीनिमित्त शासकीय महापूजा विभागीय आयुक्त डॉ.चंद्रकांत पुलकुंडवार व सायली पुलकुंडवार तसेच मानाचे वारकरी यांच्या हस्ते आज पार पडली.
वारकरी भाविकांना तसेच राज्यातील सर्व जनतेला पांडुरंगाच्या कृपेने सुख, समृद्धी, लाभो त्यांच्या जीवनात ऐश्वर्य व भरभराट येवो असे साकडे विभागीय आयुक्त डॉ.चंद्रकांत पुलकुंडवार यांनी कार्तिकी एकादशीनिमित्त आयोजित शासकीय महापुजेच्याप्रसंगी श्री विठ्ठलाच्या चरणी घातले.
लातूर जिल्ह्याच्या उदगीर तालुक्यातील बाबुराव बागसरी सगर व सौ. सागरबाई बाबुराव सगर या दांपत्याची मानाचे वारकरी म्हणून निवड करण्यात आलेली आहे. सगर दापत्य हे गवंडी काम करून आपला उदरनिर्वाह करीत आहेत. हे दाम्पत्य मागील १४ वर्षापासून नियमितपणे वारी करीत आहे. या दाम्पत्याला विभागीय आयुक्त डॉ. पुलकुंडवार यांच्या हस्ते राज्य परिवहन महामंडळाचा वर्षभर मोफत एसटी पास देण्यात आला.