अंमली पदार्थांविरोधात भारत आणि श्रीलंकेच्या नौदलांची यशस्वी कारवाई

नवी दिल्ली | दि.29 | (सौ. पीआयबी) अरबी समुद्रात श्रीलंकेचा ध्वज असलेल्या मासेमारी नौकांमधून अंमली पदार्थांची तस्करी होत असल्याचा संशय असल्याची माहिती श्रीलंकेच्या नौदलाने दिली होती. त्याआधारे भारतीय नौदलाने नौका शोधण्यासाठी आणि ती अडवण्यासाठी संयुक्त मोहीम राबवत जलद प्रतिसाद दिला.
गुरुग्राम येथील माहिती एकीकरण केंद्रातून मिळालेल्या माहितीच्या आधारे भारतीय नौदलाने लांब पल्ल्याचे सागरी गस्त विमान आणि दूरस्थ संचालन विमान तैनात करून व्यापक शोधमोहीम हाती घेतली. या प्रयत्नांना गती देण्यासाठी एक जहाजही भारतीय नौदलाने तैनात केले.
श्रीलंकेच्या नौदलाकडून सातत्याने मिळत असलेली माहिती आणि भारतीय नौदलाच्या विमानकडून हवाई पाळत या आधारे दोन नौका ओळखण्यात आल्या. त्यानंतर मोहिमेतील जहाज आणि विमान यांच्या संयुक्त प्रयत्नातून 24 आणि 25 नोव्हेंबर रोजी जहाजातील पथक दोन्ही नौकांवर उतरले. यावेळी मोहिमेत सुमारे 500 किलो अंमली पदार्थ (क्रिस्टल मेथ) जप्त करण्यात आले. दरम्यान मोहिमेला गती देण्यासाठी भारतीय नौदलाने आणखी एक नौका तैनात केली.
पुढील कायदेशीर कारवाईसाठी संबंधित दोन्ही नौका, त्यावरील खलाशी आणि जप्त करण्यात आलेले अंमली पदार्थ श्रीलंकेच्या अधिकाऱ्यांकडे सोपवण्यात आले.
दोन्ही देश आणि नौदलांमधले दृढ संबंध आणि घनिष्ठ भागिदारी या मोहिमेतून दिसून येते. क्षेत्रीय सागरी आव्हानांना तोंड देण्यासाठी आणि हिंदी महासागर क्षेत्रात सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी दोन्ही नौदलांच्या एकत्रित संकल्पाचेही ही मोहीम प्रतीक आहे.
***