कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयातर्फे एकात्मिक कीटक व्यवस्थापन प्रशिक्षण कार्यक्रमचे आयोजन

मुंबई | दि.२७ (वृत सेवा) | कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाच्या रोप संरक्षण विलगीकरण आणि साठवण महासंचालनालयाच्या मार्गदर्शनाखाली नागपूरच्या प्रादेशिक केंद्रीय एकात्मिक कीटक व्यवस्थापन केंद्राने एकात्मिक कीटक व्यवस्थापन (IPM) या विषयावर महाराष्ट्रातील अमरावती, औरंगाबाद (छत्रपती संभाजी नगर), नागपूर, परभणी, यवतमाळ या पाच जिल्ह्यांमध्ये आयोजित केलेल्या दोन दिवसीय प्रशिक्षण कार्यक्रमाला उत्साहवर्धक प्रतिसाद मिळाला. खरीप हंगामात आयोजित करण्यात आलेल्या या प्रशिक्षणात राज्य सरकार, कृषी विज्ञान केंद्रे (KVK) यांचे अधिकारी, शेतकरी आणि कीटकनाशक विक्रेते यांना प्रशिक्षित करण्यावर भर देण्यात आला.
शाश्वत पीक उत्पादनाला चालना देऊन, आयपीएम पद्धतींद्वारे इकॉनॉमिक थ्रेशहोल्ड पातळीखाली असलेल्या कृषी कीटकांचे व्यवस्थापन करण्यासाठी ज्ञान आणि व्यावहारिक कौशल्ये वाढवणे हा कार्यक्रमाचा उद्देश आहे. दीर्घकालीन कृषी शाश्वतता सुनिश्चित करण्यासाठी एकात्मिक कीटक व्यवस्थापनाच्या आवश्यकतेवर भर देण्यात आला.
या प्रशिक्षणाच्या मुख्य घटकांमध्ये नामवंत तज्ञ आणि शास्त्रज्ञांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या विविध तांत्रिक सत्रांचा समावेश होता. या सत्रांमध्ये आयपीएम, कृषी-परिसंस्थेचे विश्लेषण, सीआयबीआर अॅन्ड सी ची भूमिका आणि टोळ व्यवस्थापनाच्या विविध पैलूंवर विचार करण्यात आला. यामध्ये सहभागी होणाऱ्यांनी स्थानिक कापूस/लिंबूवर्गीय शेतात कृषी-परिसंस्था विश्लेषणाचा प्रात्यक्षिक अनुभव घेतला, ज्यामुळे त्यांना कीटक व्यवस्थापनासंदर्भात व्यावहारिक माहिती मिळाली. याव्यतिरिक्त, लवकर कीटकांचा धोका ओळखण्याचे एक साधन म्हणून राष्ट्रीय कीटक देखरेख प्रणाली ॲपच्या महत्त्वावर चर्चा करण्यात आली.