मतदान केंद्रांवर पुरेशा सुविधा पुरवाव्यात -उप निवडणूक आयुक्त हिरदेश कुमार

मुंबई (सौ.PIB)
कोकण, नाशिक विभागाची विधानसभा निवडणूक पूर्वतयारी आढावा बैठक
मुंबई, दि. ८ : विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी प्रत्येक मतदान केंद्रांवर मतदारांना किमान आश्वासित सुविधा योग्यरित्या पुरविल्या जातील, यासाठी योग्य व्यवस्थापन करावे, असे निर्देश भारत निवडणूक आयोगाचे उप निवडणूक आयुक्त हिरदेश कुमार यांनी आज कोंकण व नाशिक विभागातील निवडणूक यंत्रणांना दिले.
सह्याद्री अतिथीगृह येथे आयोजित कोकण व नाशिक विभागांतर्गत सर्व जिल्ह्यांतील विधानसभा मतदारसंघांमधील निवडणूक पूर्वतयारीबाबत आढावा बैठकीत ते बोलत होते.
या बैठकीस भारत निवडणूक आयोगाचे उप निवडणूक आयुक्त संजय कुमार, प्रधान सचिव अविनाश कुमार, राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम, भारत निवडणूक आयोगाचे उपसचिव सुमनकुमार, अवर सचिव अनिलकुमार, राज्याचे अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी पी. प्रदीप, बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्त तथा जिल्हा निवडणूक अधिकारी भूषण गगराणी, कोकण विभागीय आयुक्त डॉ. राजेश देशमुख, नाशिक विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम, मुंबई पोलीस आयुक्त विवेक फणसळकर, कोकण व नाशिक विभागातील सर्व जिल्हाधिकारी यांच्यासह मुंबई शहर जिल्ह्यातील दहा विधानसभा मतदारसंघासाठी नियुक्त केंद्रीय निवडणूक निरीक्षक (सर्वसाधारण) सत्यप्रकाश टी. एल., हिमांशू गुप्ता, समीर वर्मा, अंजना एम.,शिल्पा शिंदे, केंद्रीय निवडणूक पोलीस निरीक्षक पोनुगुंतला रामजी, केंद्रीय खर्च निरीक्षक विजय बाबू वसंता, अमन प्रीत आदी उपस्थित होते.
श्री. हिरदेश कुमार म्हणाले की, मतदान केंद्रावर पुरेशी सुरक्षा व्यवस्था, तात्पुरत्या मतदान केंद्रांची मान्यता घेणे, मतदान केंद्राचे ठिकाण बदलले असल्यास त्याबाबत मतदारांपर्यंत माहिती पोहोचविणे, त्याची प्रसिद्धी करणे, महिलांनी, दिव्यांग कर्मचाऱ्यांनी संचलित केलेले अशा प्रकारच्या विशेष मतदान केंद्रांची निर्मिती करणे, मतदान केंद्रांवर पिण्याचे पाणी, रॅम्प, सावली इ. सुविधांची निर्मिती, वेब कॅमेरे व सीसीटीव्ही कॅमेरे लावून मतदान केंद्रांचे वेबकास्टिंग करणे, मतदान केंद्राच्या बाहेर व आत कॅमेरे लावावे, अशा सूचना दिल्या. तसेच या सर्व सुविधांची पूर्तता झाल्याबाबत व आवश्यकतांबाबत स्वतः जिल्हा निवडणूक अधिकारी, पोलीस अधीक्षक, पोलीस आयुक्त यांनी स्वतः पाहणी करुन खातरजमा करावी, अशा सूचनाही त्यांनी केल्या.