सन २०२४ चा मानाचा समता पुरस्कार – चित्रपट दिग्दर्शक, अभिनेते व लेखक नागराज मंजुळे यांना प्रदान

पुणे दि.२८ | (विशेष बातमीपत्र) : अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या वतीने क्रांतिसूर्य महात्मा जोतीराव फुले यांच्या स्मृतिदिनानिमित्त दिल्या जाणाऱ्या समता पुरस्काराचे वितरण आज फुले वाडा, समता भूमी, पुणे येथे पार पडले.
प्रसिद्ध लेखक, दिग्दर्शक, अभिनेते नागराज मंजुळे यांना रुपये एक लक्ष, फुले पगडी, मानपत्र, शाल आणि स्मृतीचिन्ह देऊन हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
याप्रसंगी उपस्थितांशी संवाद साधताना अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष छगन भुजबळ यांनी आपले मनोगत व्यक्त केले. “महात्मा जोतीराव फुले, सावित्रीबाई फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी समाजातील वंचित घटकांना न्याय देण्यासाठी आपले संपूर्ण आयुष्य वेचले, लढा दिला. त्यांना देखील मोठ्या संकटांचा सामना करावा लागला. ही लढाई अद्याप संपलेली नाही.” त्यामुळे या महापुरुषांचे विचार पुढे नेऊन अन्यायाविरुद्ध लढा देण्याची गरज असून समाजातील वंचित घटकांना न्याय मिळवून देण्यासाठी आपण काम करत राहिले पाहिजे. जे लोक आपल्यासाठी लढत आहे त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले पाहिजे. महात्मा फुले समता भूमी ही आपल्यासाठी शक्ती केंद्र असून आपली वैचारिक शक्ती वाढविण्यासाठी आपण या शक्ती केंद्राला भेट देत असतो, असे विचार यावेळी छगन भुजबळ यांनी मांडले.
नागराज मंजुळे हे ज्याप्रमाणे आपल्या क्षेत्रात काम करत आहेत. त्याचप्रमाणे काम करणारे आमचा एक योद्धा हरी नरके हे होते ते आज आपल्यात नाही त्यांची मोठी उणीव आपल्याला जाणवते. त्यांनी फुले दाम्पत्याच्या सर्व साहित्याचे संशोधन करून ते सर्व साहित्य मुख्य प्रवाहात आणले. अनेक विरोध खोडून काढत सत्य समाजासमोर त्यांनी आणले. त्यांचे योगदान देखील अतिशय महत्वाचे असल्याच्या भावना अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष छगन भुजबळ यांनी या प्रसंगी मांडल्या.
यावेळी अभिनेते नागराज मंजुळे यांनी देखील आपले विचार मांडले. माझ्या दिशाहीन जीवनात महात्मा फुले यांच्या विचारांनी मला मुख्य प्रवाहात आणले. त्यामुळे आपण आज इथपर्यंत येऊ शकलो. महात्मा फुले यांचे समग्र वाड्मय वाचल्यानंतर माझ्या आयुष्यात खूप मोठे बदल घडले. आपले जगणे आणि हक्क समजण्यासाठी महात्मा फुलेंचे चरित्र वाचले पाहिजे, असे मत व्यक्त केले.
यावेळी व्यासपिठावर महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपालीताई चाकणकर, माजी मंत्री दिलीप कांबळे, आमदार पंकज भुजबळ, आमदार हेमंत रासणे, माजी खासदार समीर भुजबळ, मुस्लीम ओबीसी संघटनेचे नेते शब्बीर अन्सारी, राज्य अन्न आयोगाचे अध्यक्ष अॅड. सुभाष राऊत, अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे कार्याध्यक्ष बापू भुजबळ, महिला प्रदेशाध्यक्ष मंजिरी धाडगे, डॉ.शेफाली भुजबळ, माजी महापौर वैशाली बनकर, उपाध्यक्ष दिलीप खैरे, मनोज घोडके, अॅड.मंगेश ससाणे,अॅड.मृणाल ढोले पाटील, मनीषा लडकत, सदानंद मंडलिक, प्रा.गौतम बेंगाळे, पुणे विभागीय अध्यक्ष प्रीतेश गवळी, शहर अध्यक्ष पंढरीनाथ बनकर,महिला शहर अध्यक्ष वैष्णवी सातव, डॉ.नागेश गवळी यांच्यासह अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे पदाधिकारी कार्यकर्ते व समता सैनिक बहुसंख्येने उपस्थित होते.