नागपुर मध्ये जाहीर सभेत शरद पवार यांचा महायुती सरकारवर हल्लाबोल

नागपुर (प्रतींनिधी) : नागपूर पूर्वचे महाविकास आघाडीचे उमेदवार दुनेश्वर पेठे यांच्या प्रचार सभेत नागपूरकरांशी संवाद साधताना शरद पवार यांनी महायुती सरकारच्या कारभारावर टीका केली. आपल्या भाषणात शरद पवार यांनी बोलताना संगितले की अलीकडच्या काळामध्ये राजकारण बदललं गेलं. महाराष्ट्रामध्ये कधी नाही ते भारतीय जनता पार्टी यांच्या विचारांचं शासन तुम्हाला आम्हाला बघायला मिळालं. सबंध राज्याची सत्ता हातात होती, पाच वर्ष ही सत्ता होती. देशाची सत्ता त्यांच्या हातामध्ये होती पण पाच वर्षांच्या सत्तेनंतर जी काही निवडणूक झाली त्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीला स्वतःच्या ताकदीवर राज्याची सत्ता टिकवण्याची संधी आली असताना त्याच्यात यश आलं नाही. आज एक वेगळे सरकार आपण या ठिकाणी पाहतो. आज ज्यांच्या हातामध्ये सत्ता आहे त्यांनी प्रश्नांची सोडवणूक केली नाही. शेतामध्ये कष्ट करणारा कास्तकार आज संकटामध्ये आहे. कास्तकऱ्यांच्या आत्महत्यांमध्ये विदर्भातला नंबर हा मोठा आहे. जो कास्तकार घाम गाळतो, खून-पसीना देतो, आपल्या शेतीमध्ये धान्य तयार करतो आणि देशाची अन्नाची गरज भागवतो त्या कष्टकऱ्याला या विभागामध्ये आत्महत्याच्या रस्त्याला जाण्याची वेळ आली. त्याचे महत्त्वाचे कारण त्याच्या घामाची किंमत, त्याच्या कष्टाची किंमत देण्याची जबाबदारी ज्या सरकारवर होती त्यांनी त्या प्रश्नांकडे ढुंकून सुद्धा बघितलं नाही.
गेल्या सहा महिन्यांमध्ये नागपूर आणि आजूबाजूच्या भागातून ६३० महिला आणि मुली गायब झाल्या, त्यांचा पत्ता लागत नाही. आज स्त्रियांच्या रक्षणाच्या संबंधीची जबाबदारी राज्यकर्त्यांची आहे त्याची पूर्तता आज या राज्यकर्त्यांकडून होत नाही. म्हणून जे राज्यकर्ते शेतकऱ्यांकडे बघू शकत नाहीत, कष्टकऱ्यांच्या हिताची जपणूक करत नाहीत, स्त्रियांना संरक्षण देऊ शकत नाहीत, तरुणांमध्ये इतकी बेरोजगारी वाढत आहे त्यांच्या हाताला काम देऊ शकत नाही अशांच्या हातामध्ये सत्ता द्यायची नाही हा निकाल तुम्हाला घ्यावा लागेल आणि तो घ्यायचा असेल तर उद्याच्या निवडणुकीमध्ये या नागपूरमधल्या महाविकास आघाडीच्या सहा उमेदवारांना मोठ्या मतांनी विजयी करणं आणि भाजपाच्या हातातून सत्ता काढून घेणं आणि योग्य लोकांच्या हातामध्ये सत्ता देणं हे महत्त्वाचं काम तुम्हा सगळ्यांना करायचं आहे.